Current Affairs 26 JULY 2020

362
0
Share:

 

?1. केरळ, कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात आयसीसचे दहशतवादी : संयुक्त राष्ट्र अहवाल

 • केरळ आणि कर्नाटकमध्ये आयसीसच्या दहशतवाद्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असू शकते, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात देण्यात आला आहे. तसंच भारतीय उपखंडात अल कायदा ही दहशतवादी संघटना हल्ल्याचा कट रचत आहे. तसंच या क्षेत्रात भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमारचे १५० ते २०० दहशतवादी असल्याचंही त्यात नमूद करण्यात आलं आहे. पीटीआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
 • ‘अॅनालिटिकल सपोर्ट अँड सँक्शन्स मॉनिटरिंग टीम’चा २६ वा अहवाल प्रकाशित करण्यात आला. भारतीय उपखंडात अल-कायदा (क्यूआयएस) तालिबानच्या मदतीनं निमरूज, हेलमंद आणि कंधारमधून आपल्या कारवाया करत असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे.
 • “या संघटनेत भारत, बांगलादेश, पाकिस्तान आणि म्यानमारमधील १०० ते १५० दहशतवादी आहेत. क्यूआयएसचा म्होरक्या हा ओसामा महमूद आहे. त्यानं आसिम उमर याची जागा घेतली आहे. तसंच तो आसिम उमारच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठीही कट रचत आहे,” असंही अहवालात नमूद केलं आहे.
 • “१० मे २०१९ रोजी जाहीर करण्यात आलेल्या आयएसआयएलचे (हिंद विलय) १८० ते २०० सदस्य आहेत, असं एका सभासद देशाकडून सांगण्यात आलं. केरळ आणि कर्नाटकमध्ये आयएसआयएलच्या दहशतवाद्यांची मोठी संख्या आहे,” असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
 • गेल्या वर्षी मे महिन्यात आयसीसनं भारतात नवा प्रांत स्थापित करण्याचा दावा केला होता. तसंच काश्मीरमधील दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीनंतर ही संघटनेनं ही घोषणा केली होती.
 • यापूर्वी या दशतवादी संघटनेनं आपल्या नव्या शाखेचं नाव अरबी नाव ‘विलायह ऑफ हिंद’ असल्याचं अमाक या वृत्तसंस्थेद्वारे सांगितलं होतं. परंतु जम्मू काश्मीरच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं हा दावा फेटाळला होता.
 • यापूर्वी, काश्मीरमध्ये आयसीसचे हल्ले त्याच्या तथाकथित खोरासन प्रांत शाखेशी जोडले गेले होते. ज्याची स्थापना २०१५ मध्ये करण्यात आली होती आणि अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि आसपासच्या प्रदेश हे त्यांचं लक्ष्य होतं.

?2. पूर्व लडाखमधून सैन्य पूर्णपणे मागे घेण्यास भारत-चीनची मान्यता

 • पूर्व लडाखमधील वादग्रस्त ठिकाणांहून सैन्य लवकरात लवकर आणि पूर्णपणे माघारी घेण्याचे शुक्रवारी भारत आणि चीनने मान्य केले. द्विपक्षीय संबंधांमध्ये र्सवकष सुधारणा होण्यासाठी सीमेवरील भागात शांतता प्रस्थापित होणे गरजेचे आहे, या बाबतही दोन्ही देशांचे मतैक्य झाले.
 • भारत आणि चीन यांच्यात नव्याने ऑनलाइन राजनैतिक चर्चा झाली त्यामध्ये लडाखमधील स्थितीचा आढावा घेण्यात आला. कमांडर स्तरावर १४ जुलै रोजी झालेल्या चर्चेनंतर सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया अपेक्षेनुसार होत नसल्याचे लक्षात आल्याच्या पार्श्वभूमीवर नव्याने चर्चा करण्यात आली.
 • दोन्ही देशांचे सैन्य पूर्णपणे मागे घेण्याबाबतची रणनीती ठरविण्यासाठी चर्चेची आणखी एक फेरी लवकरच आयोजित करण्याचे शुक्रवारी झालेल्या चर्चेत दोन्ही देशांनी मान्य केले, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
 • राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात ५ जुलै रोजी दूरध्वनीवरून तणाव कमी करण्यासंदर्भात जवळपास अडीच तास चर्चा झाली. त्यानंतर ६ जुलैपासून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. कमांडरांच्या बैठकीत जो समझोता झाला त्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे दोन्ही देशांनी शुक्रवारी झालेल्या चर्चेत मान्य केले.

?3. ‘सार्वजनिक प्रशासनामधील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार 2020’ यासाठी सुधारित योजना

 • केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री, डॉ. जितेंद्र सिंग यांनी ‘सार्वजनिक प्रशासनामधील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार 2020’ यासाठी सुधारित योजना जाहीर केली आहे आणि त्यासंबंधी एका संकेतस्थळाचे लोकार्पण केले.

ठळक बाबी

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारात लोकसहभाग घेण्याच्या सरकारच्या प्रारूपाच्या अनुषंगाने या योजनेत सुधारणा करण्यात आली आहे. परिणाम निर्देशक, आर्थिक विकास, लोकसहभाग आणि जनतेच्या तक्रारींचे निवारण या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी सार्वजनिक प्रशासनात उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार या योजनेत नव्याने सुधारणा करण्यात आली.
 • जिल्हा कामगिरी निर्देशक कार्यक्रम, नवोन्मेष सर्वसाधारण श्रेणी, आकांक्षी जिल्हे कार्यक्रम आणि नमामि गंगे कार्यक्रम या चार प्रमुख विभागांमध्ये नामांकन मागविण्यात आले आहे.
 • जिल्हा कामगिरी निर्देशक कार्यक्रमाच्या अंतर्गत समावेशक विकासासाठी अग्रक्रम क्षेत्रात पतपुरवठा, जन भागीदारी – स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) आणि स्वच्छ भारत अभियान (शहरी) कार्यक्रमांच्या प्राथमिकता योजनांची प्रभावी अंमलबजावणी, सेवा वितरण आणि सार्वजनिक तक्रारींचे निराकरण याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांचे मूल्यांकन केले जाणार. राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा पातळीवरील नवकल्पनांसाठी स्वतंत्र पुरस्कार श्रेणी देण्यासाठी या योजनेची व्याप्ती आहे.
 • पुनर्रचित योजनेत “गंगा पुनरुज्जीवनासाठी चांगली कामगिरी” पुरस्कार ही गंगा जिल्ह्यांच्या विकासाला समर्पित असलेली पुरस्काराची नवी श्रेणी तयार करण्यात आली आहे. याद्वारे नमामि गंगे कार्यक्रमाच्या अंतर्गत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार 57 अधिसूचित जिल्हा गंगा समित्यांपैकी एका जिल्ह्याला देण्यात येणार.
 • 31 ऑक्टोबर 2020 रोजी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त या पुरस्कारांचे वाटप करण्यात येणार. 2020 योजनेत एकूण 15 पुरस्कार देण्यात येतील.

?4. पहिली ते बारावी अभ्यासक्रमात २५ टक्के कपात

 • देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून त्यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्ण आहेत. हे लक्षात घेता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सध्या ऑनलाईन शाळा सुरू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाने पहिली ते बारावी या अभ्यासक्रमात सुमारे २५ टक्केे कपात केली आहे. ही कपात करताना १०१ विषयांचा अभ्यास कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
 • तर दहावीबाबत पुढील शिक्षणासाठी उपयुक्त गणित आणि विज्ञानातील पाठ कायम ठेवून इतर अभ्यासक्रमात कपात करण्यात आली आहे. सध्याचे २०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष ऑनलाईन, टीव्ही आणि इतर माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. प्रत्यक्षात शाळा सुरू न झाल्याने मुलांच्या मनावरील दडपण कमी करण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.
 • पाठ्यक्रमातून २५ टक्केे भाग वगळताना भाषा विषयांमध्ये काही गद्य आणि पद्य पाठ व त्यावर आधारीत स्वाध्याय कृती वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी अंतर्गत मूल्यमापन व वार्षिक परीक्षा यामध्ये या घटकांवर कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही. भाषा विषयातील व्याकरण यातून वगळण्यात आलेले नाही. इतर विषयांमधील काही भाग विद्यार्थ्यांना स्वअध्यायनासाठी देण्यात आला आहे.
 • इयत्ता १ ली ते १२ वीचा इयत्ता निहाय, विषय निहाय कमी करण्यात आलेला २५ टक्के अभ्यासक्रमmaa.ac.in वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आला आहे. कमी केलेल्या अभ्यासक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधक परीक्षक यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

?5. अरुण कुमार: आंतरराष्ट्रीय रेल्वे संघाच्या सुरक्षा विभागाचे नवे उपाध्यक्ष

 • रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक असलेले अरुण कुमार यांची पॅरिस येथे मुख्यालय असलेल्या आंतरराष्ट्रीय रेल्वे संघाच्या (UIC) सुरक्षा विभागाचे उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. UICच्या 96व्या महासभेच्या वेळी हा निर्णय घेण्यात आला.
 • ही नियुक्ती दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी झाली आहे म्हणजेच जुलै 2022 ते जुलै 2024 पर्यंत ते पदावर असणार.

आंतरराष्ट्रीय रेल्वे संघ (UIC) विषयी…

 • आंतरराष्ट्रीय रेल्वे संघ (UIC) याची स्थापना 1922 साली झाली आणि त्याचे मुख्यालय फ्रान्स देशाची राजधानी पॅरिस या शहरात आहे. संघाची उद्दिष्टे तीन स्तरांनुसार परिभाषित केली गेली आहेत; ते आहेत –धोरणात्मक, तांत्रिक/व्यवसायिक आणि समर्थन सेवा.
 • वर्तमानात इटलीचे जियान्लुइगी कॅस्टेली संघाचे अध्यक्ष आहेत आणि फ्रान्सिओस डेवेन्न महासंचालक आहेत.
 • UIC संघाचा सुरक्षा विभाग रेल्वे क्षेत्रातली मालमत्ता, स्थापना आणि सुरक्षा यांच्या संबंधित सर्व बाबींसाठी विश्लेषण आणि धोरणे निश्चित करते आणि ते विकसित करण्याचे अधिकार ठेवतो. या व्यासपीठाद्वारे सदस्यांमध्ये माहितीची आणि अनुभवांची देवाणघेवाण होते आणि सुरक्षेला प्रोत्साहन दिले जाते.

?6. IPL 2020 | क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी, 19 सप्टेंबरपासून IPL ची सुरुवात

 • इंडियन प्रीमियर लीग (IPL 2020) च्या तेराव्या सिझनची वाट पाहणाऱ्या क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी. यंदाची आयपीएल 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमीरातमध्ये सुरु होणार आहे. तर आयपीएलची फायनल आठ नोव्हेंबरला होणार असल्याची माहिती आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली आहे..
 • स्पर्धेच्या आयोजनात कोणताही बदल करण्यात आलेला नसून, बीसीसीआयने सर्व संघमालकांना याबद्दल प्राथमिक कल्पना देऊन ठेवलेली असल्याची देखील माहिती आहे.
 • आयपीएल व्यवस्थापन परिषदेची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे, या बैठकीत आयपीएलबाबत अंतिम रुपरेषा ठरणार आहे. माहिती अशीही मिळाली आहे की, बीसीसीआयने आपल्या निर्णयाबाबत फ्रेंचायजींना देखील माहिती दिली आहे.
 • बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं होतं की, पूर्ण शक्यता आहे की, आयपीएल 19 सप्टेंबरपासून सुरु होईल आणि 8 नोव्हेंबरला फायनल खेळवली जाईल. यानुसार आयपीएल 13 सिझनचं हे आयोजन 51 दिवसांचं असेल.

लवकरच येणार वेळापत्रक

 • आयपीएलची तारीख ठरली असली तरी अजून किती सामने होणार आणि कुठे होणार याबाबतचं वेळापत्रक मात्र तयार झालेलं नाही. एका आठवड्याच्या आत आयपीएलचं वेळापत्रक येण्याची शक्यता आहे. आयपीएलकडून हे शेड्यूल लवकरच जाहीर होऊ शकतं.
 • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा टी20 विश्वचषक स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलचा हा 13 वा हंगाम 26 सप्टेंबरपासून सुरु होईल असं सांगितलं जात होतं, मात्र आता एक आठवडा आधीच सुरु होऊ शकतं, कारण त्यानंतर टीम इंडियाचा आस्ट्रेलिया दौरा होणार आहे. अधिकाऱ्यानं सांगितलं की, भारतीय संघाला आस्ट्रेलिया सरकारच्या नियमानुसार त्या दौऱ्यात 14 दिवस क्वारंटाईन राहावं लागणार आहे.

 

 


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos