Current Affairs 24 May 2020

Share:

 

1. जागतिक बँकेतील पदावर आभास झा

• जागतिक बँकेत भारतीय अर्थशास्त्रज्ञ आभास झा यांची दक्षिण आशियातील हवामान बदल व आपत्ती व्यवस्थापन जोखीम व्यवस्थापन विभागात प्रक्रिया व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
• जागतिक पातळीवर हवामान बदल व आपत्ती व्यवस्थापनाच्या ज्या प्रगत पद्धती आहेत, त्या दक्षिण आशियात वापरण्यासाठी त्यांचे मोठे योगदान असणार आहे.
• पश्चिम बंगाल, ओडिशा व बांगलादेश यांना अम्फान वादळाचा तडाखा बसलेला असतानाच त्यांची या विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. हवामान बदल व इतर काही समस्यांवर उच्च प्रतीची विकासात्मक प्रक्रिया स्वरूपाची उत्तरे सुचवण्याची जबाबदारी त्यांच्या विभागावर आहे.
• सिंगापूर येथे झा यांची नियुक्ती झाली असून दक्षिण आशियातील नैसर्गिक आपत्तींवर प्रक्रियात्मक व्यवस्थापकीय उपाय सुचवण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे.

2. अमेरिकेने ‘ओपन स्कायज ट्रीटी’ मधून माघार घेतली

• रशियाने केलेल्या कराराच्या उल्लंघनाचा खुलासा करीत संयुक्त राज्ये अमेरिका या देशाने ‘ओपन स्कायज ट्रीटी’ या 34 देशांच्या करारामधून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत.
कराराविषयी
• 1 जानेवारी 2002 रोजी ‘ओपन स्कायज ट्रीटी’ हा करार अस्तित्वात आला. या करारामुळे सहभागी देशांना निशस्त्र हवाई पाळत ठेवण्याची परवानगी मिळते.
• लष्करी कारवाया आणि त्यांच्याशी संबंधित इतर बाबींची हवाई मार्गाने घेतलेल्या छायाचित्रांद्वारे माहिती गोळा करण्याची परवानगी कराराच्या स्वाक्षरीकर्त्यांना देऊन परस्पर देशांमधला विश्वास वाढविण्याच्या उपाययोजना आणि परस्पर समन्वय आणि सहकार्यामध्ये सुधारणा करणे हा कराराचा मुख्य उद्देश आहे.
• लिथ्यानिया, स्लोव्हाकिया, इटली, रशिया, स्लोव्हेनिया, क्रोएशिया, हंगेरी, डेन्मार्क (ग्रीनलँडसह), टर्की, झेक प्रजासत्ताक, रोमानिया, स्वीडन, लक्समबर्ग, बोस्निया आणि हर्जेगोविना, जर्मनी, बेल्जियम, कॅनडा, ग्रीस, नॉर्वे, आईसलँड, एस्टोनिया, फ्रान्स, ब्रिटन, जॉर्जिया, फिनलँड, लाटविया, बल्गेरिया, पोलंड, कझाकस्तान, बेलारूस, युक्रेन, स्पेन, नेदरलँड्स, पोर्तुगाल हे या कराराचे 34 सदस्य आहेत. किर्गिस्तानने या करारावर स्वाक्षरी केली आहे परंतु त्याला मंजूरी दिलेली नाही.

3. राज्यात गुंतवणुकीसाठी तीन वर्षे परवानगीची अट रद्द

• राज्यात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याकरिताच पुढील तीन वर्षे गुंतवणुकीसाठी कोणत्याही परवानगीची आवश्यकता नसेल. तसेच ४० हजार एकर जागा गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घेतला आहे.
• करोनामुळे रुतलेले अर्थचक्र गतिमान करण्याकरिता विविध उपाय राज्य सरकारच्या वतीने करण्यात येत आहेत. गुंतवणूकदारांना पोषक वातावरण निर्माण करण्याकरिताच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने काही धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. गुंतवणुकीकरिता उद्योजकांना परवानग्या घ्याव्या लागतात.
• या परवानग्या मिळण्यास अनेकदा विलंब होतो. हे टाळण्यासाठीच गुंतवणुकीसाठी राज्यात पूर्वपरवानगीची गरज नसेल. उद्योजकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा या उद्देशानेच उद्योगमंत्री सुभाष देसाई व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.अनबलगन यांनी प्रचलित नियमांमध्ये काही बदल केले आहेत. राज्याच्या विविध भागांमध्ये गुंतवणूकदारांना ४० हजार एकर जागा उपलब्ध करून देण्यात येईल. ही जागा दीर्घ किं वा अल्पकालीन भाडेपट्टय़ावर उपलब्ध होऊ शकेल. जागेवर सर्व पायाभूत सुविधा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून उपलब्ध करून दिल्या जातील.

कामगार निवासाची उभारणी
• करोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीत सारे व्यवहार ठप्प झाले. भविष्यात असे कोणतेही संकट उभे राहिल्यास त्याच्याशी सामना करण्याकरिता आतापासूनच प्रयत्न करण्यात येणार आहेत.
• एक हजारापेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखान्यांच्या आवारात कामगार निवास बांधण्याकरिता मोफत जागा उपलब्ध के ली जाईल. हजारापेक्षा कमी कामगार असलेल्या कारखान्यांमधील कामगारांच्या निवासाकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याकरिता स्वतंत्र विभाग कार्यरत राहणार आहे.

मित्र संकल्पना
• जागेसाठी अर्ज केल्यापासून प्रत्यक्ष उत्पादन निर्मिती सुरू होण्यापर्यंतच्या प्रक्रियेत उद्योजकांना मदत करण्याच्या उद्देशाने ‘मित्र’ (महाराष्ट्र इंडस्ट्रियल अ‍ॅण्ड ट्रेड रिलेशनशिप मॅनेजर) ही नवीन संकल्पना राबविण्यात येणार आहे.
• प्रत्येक कंपनीसाठी मित्र नियुक्त केले जातील. उद्योजकांना सर्व मदत करणे हे या मित्रांचे काम असेल. उद्योजकांना वित्तीय साहाय्य किंवा कायदेशीर मदत उपलब्ध होण्याकरिता विशेष यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा लवादासमोर आजारी उद्योग बंद करणे किंवा नव्याने सुरू करण्यासाठी कायदेशीर मदतही या यंत्रणेकडून दिली जाईल.

4. नागपूर ठरले जगातील आठव्या क्रमांकाचे उष्ण शहर

• नागपूर आज देशातील तिसऱ्या तर जगातील आठव्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले. नागपुरात शनिवारी यंदाच्या मोसमातील सर्वाधिक ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
• हवामान खात्याने विदर्भात उष्णतेच्या सौम्य लाटेचा इशारा दिला होता. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून शहरातील तसेच विदर्भ विभागातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. शनिवारी नागपूर खालोखाल अकोल्यात ४६ तसेच चंद्रपूर आणि अमरावती येथे प्रत्येकी ४५.६ अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली.
• आज विदर्भातील सहा जिल्ह्यांमधील तापमान ४५ अंशांहून अधिक होते. विदर्भात अकोला आणि अमरावती येथे पुढील चार दिवस तर नागपुरात पुढील तीन उष्णतेच्या मध्यम स्वरूपाच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत शहरातील तापमान ४६ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
• शनिवारी देशात पिलानी येथे सर्वाधिक ४६. ७, त्या खालोखाल चुरू येथे ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
• हवामान शास्त्राशी निगडीत असलेल्या एल्डोरॅडो या प्रसिद्ध संकेतस्थळानुसार शनिवारी नागपूर जगातील आठव्या क्रमांकाचे उष्ण शहर होते. या संकेतस्थळानुसार सेनेगल या देशातील मताम (४८.२ अंश) हे जगातील सर्वाधिक उष्ण शहर होते. तसेच जगातील पहिल्या १० उष्ण शहरांमध्ये देशातील पिलानी, चुरू आणि नागपूर या तीन शहरांचा समावेश होता.

5. अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेच्या नऊ उपाययोजना

• 22 मे 2020 रोजी भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीच्या आणि अनिश्चित काळात वित्तीय ओघ सुरळीत ठेवण्यासाठी आणि वित्तीय स्थैर्य राखण्यासाठी नव्या नऊ उपाययोजना जाहीर केल्या.
• रेपो दरात 40 बेसिस पॉईंटची कपात करत हा दर 4.4 टक्क्यांवरून 4 टक्के केला. सीमांत स्थायी सुविधा दर (MSF) आणि बँक दरात कपात करून हा दर 4.65 टक्क्यांवरून 4.25 टक्के करण्यात आला आहे. रिव्हर्स रेपो दर 3.75 टक्क्यांवरून 3.35 टक्क्यांवर केला आहे.
• RBIने याआधी जाहीर केलेल्या काही नियामक उपाययोजनांना आणखी 3 महिन्यांची 1 जून 2020 पासून 31 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या उपाययोजना आता एकूण सहा महिन्यांसाठी (1 मार्च 2020 ते 31 ऑगस्ट 2020) लाग राहतील.

6. गगनयान मिशनच्या अंतराळवीरांचे प्रशिक्षण सुरू

• भारतातर्फे पहिली मानवासहित अंतरिक्ष मोहीम गगनयान या नावाने राबवली जाणार असून त्या मोहिमेसाठी निवडण्यात आलेल्या चार अंतराळवीरांच्या प्रशिक्षणाची कार्यक्रम पुन्हा सुरू झाला आहे.
• त्यांना रशियात प्रशिक्षण दिले जात आहे. करोनामुळे त्यांचे हे प्रशिक्षण काही काळ थांबवण्यात आले होते.
• रॉसकॉसमॉस या रशियन अंतरीक्ष कार्पोरेशननेहीं ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, गागारिन संशोधन आणि अंतराळ प्रशिक्षण केंद्रात 12 मे पासून त्यांचे हे प्रशिक्षण सुरू झाले आहे.
• भारत आणि रशिया यांच्यातील करारानुसार चार अंतराळवीरांना रशियात हे प्रशिक्षण दिले जात आहे. या चारही भारतीय अंतराळवीरांची तब्बेत उत्तम आहे. करोना विषयक सर्व दक्षता घेऊनच त्यांचे हे प्रशिक्षण सुरू असल्याचे या संस्थेने म्हटले आहे. अंतरीक्षवीरांच्या वेषात भारतीय ध्वजासह या अंतराळवीरांचे छायाचित्रही या संस्थेने प्रसिद्ध केले आहे.
• भारताची ही गगनयान मोहीम सन 2022 साली हाती घेतली जाणार असून त्यासाठी तब्बल दहा हजार कोटी रुपये इतका खर्च येणार आहे.
10 फेब्रुवारीपासून या अंतराळवीरांचे रशियात प्रशिक्षण सुरू आहे. रशियातील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतीय यानाच्या संबंधात त्यांना पुन्हा भारतात प्रशिक्षण दिले जाणार आहे.


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos