Current Affairs 13 OCTOBER 2019

143
0
Share:

 

🎯 सिंधू संस्कृतीतील व्यक्तींच्या चेहऱ्यांची तंत्राद्वारे पुनर्निर्मिती

 • हरियाणातील राखीगढीमध्ये सापडलेल्या सिंधू संस्कृतीतील ३७ कवट्यांपैकी दोन व्यक्तींचे चेहरे शास्त्रज्ञांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पुनर्निर्मित करण्यात यश मिळविले आहे.
 • देशभरातील १५ शास्त्रज्ञांनी राखीगढीत केलेल्या संशोधनात तेथील सांगाडे आणि संस्कृती ४५०० वर्षांपूर्वीची असल्याचे सिद्ध झाले आहे.
 • लेखक ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ आणि पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. वसंत शिंदे आणि डब्ल्यू. जे. ली यांनी या संशोधनाचे नेतृत्त्व केले. राखीगढी संशोधनात विविध विद्याशाखांचे १५ शास्त्रज्ञ सहभागी झाले होते.
 • भारतासह दक्षिण कोरिया, ब्रिटनमधील सहा संस्थांनी त्यात योगदान दिले. उत्खननात आढळलेल्या दोन कवट्यांचे चेहरे ‘क्रॅनिओफेशिअल रिकन्स्ट्रक्शन’ (सीएफआर) या तंत्राद्वारे पुन्हा तयार करण्यात आले आहेत.
 • जागतिक पातळीवर प्रसिद्ध अशा अनॉटॉमिकल सायन्स इंटरनॅशनल या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
 • आतापर्यंत सिंधू संस्कृतीतील लोकांची चेहरेपट्टी नेमकी कशी होती, ते सांगणे अवघड होते. त्यासंदर्भात सिंधू संस्कृतीच्या काळातील मृतदेह पुरण्याच्या जागांचे संशोधन इतक्या मोठ्या प्रमाणावर झाले नव्हते.
 • त्याशिवाय मानववंशशास्त्राच्या दृष्टीनेही पुरेसा माहितीसाठी नव्हता. मोहेंजोंदडो येथे सापडलेल्या प्रसिद्ध अशा ‘पुरोहित राजा’ या प्रतिमेशिवाय अन्य काहीही हाती नव्हते. इतकेच नव्हे तर, आजच्या इतके तंत्रज्ञान आणि अन्य साधनेही मदतीला नव्हती, याकडेही शास्त्रज्ञांनी लक्ष वेधले आहे.

🎯 मोदी जिनपिंग भेटीत काश्मीर मुद्दाच आला नाही परराष्ट्र सचिव

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात दुसऱ्या अनौपचारिक परिषदेत काश्मीर मुद्दा उपस्थित झाला नाही किंवा त्यावर चर्चा झाली नाही अशी माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली.
 • दोन्ही नेत्यांच्या चर्चेत काश्मीरचा विषय आला नाही. आमची भूमिका यावर स्पष्ट आहे. काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय आहे अशी माहिती गोखले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 • चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या बैठकीत काश्मीर मुद्दावर चर्चा झाली होती.
 • त्या बातम्या आम्ही पाहिल्या आहेत. काश्मीर मुद्यावर भारताची भूमिका स्पष्ट आहे. जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. चीनला त्याची कल्पना आहे.
 • भारताच्या अंतर्गत विषयावर अन्य देशांनी त्यांचे मत नोंदवू नये असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार या आठवडयात म्हणाले होते.
 • इम्रान खान आणि जिनपिंग यांच्या बैठकीनंतर चीन आणि पाकिस्तानच्या संयुक्त निवेदनात चीनचे काश्मीरमधल्या परिस्थितीवर बारीक लक्ष आहे. संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार शांततामय मार्गाने तोडगा काढावा असे म्हटले होते.
 • ५ ऑगस्टला भारत सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर करुन जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले होते.
 • भारताच्या या निर्णयावर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड गदारोळ केला. पण टर्की, मलेशिया आणि चीन वगळता पाकिस्तानला कुठल्याही देशाचा पाठिंबा मिळाला नाही.

🎯 पाकची तळी उचलणाऱ्या मलेशियाकडून वस्तू आयातीवर निर्बंध

 • भारत मलेशियाकडून होणाऱ्या पामतेल आणि अन्य उत्पादनांच्या आयातीवर निर्बंध घालण्याचा विचार करत आहे. सरकार आणि उद्योग जगतातील सूत्रांच्या हवाल्याने हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
 • काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयावर मलेशियाने टीका केली होती. त्यामुळे भारत सरकार मलेशियाकडून होणाऱ्या वस्तुंच्या आयातीवर निर्बंध घालण्याचा विचार करत आहे.
 • भारताने आक्रमण करुन जम्मू-काश्मीर ताब्यात घेतलं आहे. भारताने पाकिस्तानसोबत चर्चा करुन तोडगा काढावा असे वक्तव्य मलेशियाचे पंतप्रधान माहाथीर मोहम्मद यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये केले होते.
 • मलेशियन पंतप्रधानांच्या या विधानावर मोदी सरकार नाराज आहे. ५ ऑगस्टला भारत सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर करुन जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले होते.
 • भारताच्या या निर्णयावर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड गदारोळ केला. पण टर्की, मलेशिया आणि चीन वगळता पाकिस्तानला कुठल्याही देशाचा पाठिंबा मिळाला नाही.
 • मलेशिया हा तेरा राज्ये आणि तीन संघराज्यीय प्रदेशांनी बनलेला आग्नेय आशियामधील एक देश आहे.
 • मलेशियाची राजधानी क्वालालंपूर असून पुत्रजय येथे संघराज्य शासनाचे मुख्य केंद्र आहे.
 • ३, २९, ८४७ वर्ग कि.मी. क्षेत्रफळाचा विस्तार असलेल्या या देशाचे दक्षिण चिनी समुद्राने विभागलेले द्वीपकल्पीय मलेशिया आणि मलेशियन बोर्निओ हे प्रमुख दोन भाग आहेत.
 • थायलंड, इंडोनेशिया, सिंगापूर, ब्रुनेई आणि फिलिपाइन्स या देशांना लागून मलेशियाच्या सीमा आहेत.

🎯 महात्मा गांधींच्या स्मरणार्थ ब्रिटन काढणार विशेष नाणं

 • राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ ब्रिटन एक नाणं काढणार आहे. ब्रिटनचे मुख्य अर्थमंत्री साजिद जाविद यांनी ही माहिती दिली आहे.
 • मूळ पाकिस्तानी वंशाचे असलेल्या ब्रिटिश अर्थमंत्र्यांनी ब्रिटनच्या रॉयल मिंटला याबाबत आदेश दिले आहेत. महात्मा गांधींचे विचार कधीही विसरले जाऊ नयेत यासाठी हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 • ब्रिटनमध्ये महात्मा गांधींच्या १५०व्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात काही पुरस्कारांचे वाटप करण्यात आले, यावेळी जाविद बोलत होते. ते म्हणाले, “गांधींच्या स्मरनार्थ ब्रिटन एक नाणं प्रकाशित करणार आहे हे सांगण्याची हीच योग्य वेळ आहे.
 • गांधींनी जगाला जो संदेश दिला तो आपण कधीही विसरू शकत नाही. सत्ता ही केवळ संपत्तीतून किंवा उच्च पदामुळे मिळत नाही.
 • जेव्हा गांधी ब्रिटनमध्ये होते तेव्हा त्यांच्याकडून आपल्या पालकांनी त्यांची मुल्यं आत्मसात केली. ती मुल्य आजही आपण जपली आहेत.”
 • नुकतीच २ ऑक्टोबर २०१९ रोजी महात्मा गांधींची १५० वी जयंती भारतासह जगभरात उत्साहात साजरी करण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातील राजकारणात महात्मा गांधी ही व्यक्ती नेहमीच अग्रभागी राहिली.
 • त्यांच्या सत्याग्रह आणि अहिंसा या तत्वांचा जगात गौरव केला जातो. ब्रिटनमध्ये वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या आणि नंतर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भुमिका बजावणाऱ्या महात्मा गांधींचे तिथे एक विशेष आदराचे स्थान आहे.

🎯 मेरी कोमचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं उपांत्य फेरीत पराभव

 • भारताची आघाडीची महिला बॉक्सर मेरी कोमचं जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं आहे.
 • ५१ किलो वजनी गटात टर्कीच्या बुसेन्झ कैरोग्लुने मेरी कोमवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. मे
 • री कोमने याआधी सामन्यात कोलंबियाच्या व्हिक्टोरिया वेलेन्सियावर मात केली होती. यंदाच्या स्पर्धेतही मेरी कोम सुवर्णपदक पटकावेल अशी सर्वांना आशा होती.
 • मात्र उपांत्य फेरीत मेरी कोमच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. या पराभवामुळे मेरी कोमला कांस्यपदकावर समाधान मानावं लागणार आहे.
 • पहिल्या दोन राऊंडमध्ये मेरी कोमने चांगली सुरुवात केली. मात्र आपल्या प्रतिस्पर्ध्यावर अंकुश ठेवणं तिला जमलं नाही.
 • मेरीच्या प्रत्येक फटक्याचं उत्तर टर्कीच्या बुसेन्स कैरोग्लुने धडाकेबाद पद्धतीने दिलं. पहिल्या दोन राऊंडपर्यंत सामना अटीतटीचा चालला होता.
 • मात्र अखेरच्या राऊंमध्ये शेवटच्या मिनीटभरात बुसेन्सने जोरदार पुनरागमन करत मेरी कोमवर प्रहार केले, ज्यामुळे काही क्षणांसाठी मेरी कोम बॅकफूटवर केली. अखेरीस पंचांनी टर्कीच्या खेळाडूच्या पारड्यात आपलं मत टाकलं.
 • १ विरुद्ध ४ अशा फरकाने टर्कीच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने या सामन्यात बाजी मारली. मेरी कोम व्यतिरीक्त भारताच्या आणखी ३ महिला बॉक्सर पदकाच्या शर्यतीत आहेत.

🎯 भारताच्या मंजू राणीची अंतिम फेरीत धडक

 • रशियात सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात भारताच्या मंजू राणीने अंतिम फेरीत धडक मारली आहे.
 • उपांत्य फेरीत मंजूने थायलंडच्या सी.सक्सरतवर ४-१ ने मात केली.
 • तब्बल १८ वर्षांच्या कालावधीनंतर भारताची महिला बॉक्सर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीत पोहचली आहे.
 • त्यामुळे अंतिम फेरीत मंजू राणीकडून भारताला सुवर्णपदकाच्या आशा वाढलेल्या आहेत.
 • भारताच्या मेरी कोमला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. ६ सुवर्णपदकं जिंकणाऱ्या मेरी कोमचं सातव्या सुवर्णपदकाला मुकावं लागलं.
 • ५१ किलो वजनी गटात टर्कीच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र भारताच्या मंजू राणीने ४८ किलो वजनी गटात पदकाची आशा कायम ठेवली आहे.\

🎯 केनियाच्या एल्युड किपजॉजची विक्रमी कामगिरी

 • Vienna Marathon
 • केनियाचा धावपटू एल्युड किपजॉजने शनिवारी ऐतिहासीक कामगिरीची नोंद केली आहे. विएन्ना येथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत एल्युड किपजॉजने दोन तासांच्या आत मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केली. अशी कामगिरी करणारा एल्युड पहिला धावपटू ठरला आहे. १ तास ५९ मिनीटं आणि ४०.२ सेकंदात एल्युडने ही शर्यत पूर्ण केली.
 • ३४ वर्षीय एल्युड किपजॉजने याआधी बर्लिन मॅरेथॉनमध्ये २ तास १ मिनीट आणि ३९ सेकंदात शर्यत पूर्ण करत विक्रम नोंदवला होता. आपल्या याच कामगिरीचा विक्रम मोडत एल्युडने ऐतिहासीक कामगिरी केली आहे.
 • या कामगिरीनंतर एल्युडने पत्रकारांशी बोलताना समधान व्यक्त केलं. “माझ्या कामगिरीवरुन लोकांनी प्रेरणा घ्यावी असं मला वाटतं. माणसासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आज मी ही ऐतिहासीक कामगिरी करु शकलो याचा मला आनंद आहे.”

🎯 द्युती चंदचा राष्ट्रीय विक्रम

 • भारताची आघाडीची धावपटू द्युती चंद हिने ५९व्या राष्ट्रीय खुल्या ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत आपला स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला.
 • दोहा येथील जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्यात अपयशी ठरलेल्या २३ वर्षीय द्युतीने ११.२२ सेकंद अशी कामगिरी नोंदवत या वर्षी आशियाई स्पर्धेत रचलेला ११.२६ सेकंदांचा विक्रम मागे टाकला.
 • ‘‘काही दिवसांपूर्वी या मोसमाच्या अखेरीस माझे शरीर थकले आहे, असा माझा चुकीचा समज झाला होता. मात्र मी पूर्णपणे तंदुरुस्त असल्यामुळेच मला राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घालता आली,’’ असे द्युतीने सांगितले.
 • पुरुषांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अमिया कुमार मलिक सर्वात वेगवान धावपटू ठरला. त्याने मलेशियाच्या जोनाथन अनाकमायेपा याला मागे टाकत १०.४६ सेकंद अशी वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले. पंजाबच्या गुरिंदरवीर सिंग याने कांस्यपदक प्राप्त केले.
 • एमपी. जबीर याने ४०० मीटर अडथळा शर्यतीत ४९.४१ सेकंद अशी वेळ देत स्पर्धाविक्रमाची नोंद केली.

🎯 ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर

 • तीस वर्षांत हिंदी, मराठी आणि तेलुगूमध्ये नाटक, सिनेमा आणि मालिका या तीनही माध्यमांत लीलया संचार करून आपली वेगळी छाप उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे.
 • मराठी रंगभूमीचे संस्थापक विष्णुदास भावे यांच्या नावाने येत्या मराठी रंगभूमी दिनी, ५ नोव्हेंबरला पुरस्काराचं वितरण होणार आहे.
 • मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विष्णूदास भावे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी ‘रंगभूमी दिना’ला येथील अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर संस्था व नाट्य परिषदेतर्फे हा पुरस्कार समारंभपूर्वक दिला जातो.
 • १९५२ पासून या पुरस्कारांची फार मोठी अशी परंपरा आहे. नाट्यक्षेत्रातील या मानाच्या पुरस्कारासाठी यावर्षी ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांची निवड झाल्याचे संस्थेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.
 • ‘चार दिवस सासूचे’, ‘होणार सून मी ह्या घरची’ आणि ‘तुझं माझं ब्रेक-अप’मधील या मालिकांमधील भूमिका असो किंवा ‘अग्निपथ’ सिनेमातील अमिताभ बच्चन यांच्या आईची त्यांनी साकारलेली भूमिका असो, आपल्या अभिनयाचा अनोखा ठसा ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी मनोरंजन विश्वात उमटवला आहे.

पुरस्काराचं स्वरूप:-

 • विष्णुदास भावे यांच्या नावाचं गौरवपदक, ११ हजार रूपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

 


Latest Current Affairs Videos

Latest Current Affairs Videos